केव्हा तरी पहाटे


___________

केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली

सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा, फसवून रात गेली

कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा, निसटून रात गेली

उरले उरात काही, आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे, उचलून रात गेली

स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्ती
मग ओळ शेवटाची, सुचवून रात गेली