पाचोळे आम्ही हो पाचोळे


__________________


पाचोळे आम्ही हो पाचोळे
काय कुणाशी देऊ, कुणाचे घेऊ ?
वणवण भटके वनांतले
पाचोळे आम्ही हो पाचोळे

कधी भरारी अथांग गगनी
न कळे केव्हा येतो अवनी
मोहपाश ना आम्हा कुणाचा
स्वैर आम्ही आपुले

तरलो त्या प्रक्षुब्ध सागरी
आणि उतरलो दरी-कपारी
वसुंधरेचे स्वरूप आम्ही
तेही दुरून देखिले

इतुके अमुचे असुनी काही
वैर कुणाशी कसले नाही
कसेही असो आम्ही मानतो
जीवन अपुले भले

कुठे आमुची असते वसती
आस्थेने ना कोणी पुसती
अंध खलाशापारी आमुचे
जीवन नौकेतले
______________

गीत : अण्णा जोशी
स्वर / संगीत : सी. रामचंद्र