गोवा आणि बाकीबाब



माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कड्याकपारी मधोनी घट फुटती दुधाचे॥१॥
माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसाची रास
फुली फळाचे पाझर फळी फुलाचे सुवास॥२॥
माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा॥३॥
माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले
भोळा भाबडा शालीन भाव शब्दावीण बोले॥४॥
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने सोन केवड्याचा हात॥५॥
माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी
खोल आरक्त घावात शुद्ध वेदनाची गाणी॥६॥