मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो



___________________

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

असेच रोज न्हाउनी लपेट ऊन्ह कोवळे
असेच चिंब केस तू उन्हांत सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो

अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी कळ्यांस गूज आपुले
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो

तसा न राहिला अता उदास एकटेपणा
तुझीच रूपपल्लवी जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
___________

गीत  - सुरेश भट
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर - हृषिकेश रानडे