तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना


____________

तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना

एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो
भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना

घेतले व्रत आज आम्ही स्वप्‍न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना
__________________

गीत - पवन खेबूडकर
संगीत - अशोक पत्की
स्वर - शौनक अभिषेकी

हे पत्र तुला लिहिताना



________________

हे पत्र तुला लिहिताना का अबोल होते शाई ?
का रंग खरा शब्दांचा पानावर उमटत नाही ?
नभ ओळवते, मन मोहरते, पण तोल जात नाही
अनिवार सरी, उरतात उरी, बरसात होत नाही

ह्या अजाण शब्दांच्या ओठी अल्लड गाणे
हे वयात येणारे अवखळ अमोल तराणे
हे कागद-कोरे अंगण, आतूर भिजाया कणकण
कधी बावरे, कधी सावरे, मन बोलत नाही काही

त्या तुझ्या किनार्‍याला जाती लाखो लाटा
कोणत्या दिशा माझ्या, कोणत्या माझ्या वाटा
व्याकूळ मनाच्या द्वारी, अस्वस्थ क्षणांची वारी
क्षण अक्षरे, क्षण भोवरे अन्‌ अजूनी बरेच काही
_______________

गीत     - वैभव जोशी
संगीत - अशोक पत्की
स्वर - सुवर्णा माटेगावकर