तव नयनांचे दल हलले ग !


_______________

तव नयनांचे दल हलले ग !
पानावरच्या दवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग !

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरी ढासळले, सुर कोसळले
ऋषी, मुनी, योगी चळले ग !

ऋतुचाक्राचे आस उडाले
आभाळातुनी शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले ग !"

हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपी जग सावरले ग !
_______________

गीतकार : बाकीबाब बोरकर
स्वर : रविंद्र साठे
*स्वर/संगीत : सलील कुलकर्णी (originally)

जीवन त्यांना कळले हो


________________

मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो

जलापरी मन निर्मळ ज्यांचे
गेले तेथे मिळले हो
चराचाराचे होऊनी जीवन
स्नेहसां पजळले
जीवन त्यांना कळले हो

सिंधुसम हृदयात जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनावर
घन होऊनी जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो

दूरित जयांच्या दर्शनमात्रे
मोहित होऊनी जाळले हो
पुण्य जयांच्या उजवाडाने
फुलले अन परिमळले हो
जीवन त्यांना कळले हो

आत्मदळाने नक्षत्राने
वैभव ज्यांनी तुळीले हो
सायासाविण ब्रम्ह सनातन
घरीच ज्या आढऴले हो
उरीच ज्या आढऴले हो
________________

गीतकार : बाकीबाब बोरकर
संगीत : भानुकांत लुकतुके
स्वर : श्यामा चित्तार व कैलाशनाथ जैस्वाल